बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. बुधवारी काकती पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत दगडफेक आणि घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. महिला देखील हाणामारीत सहभागी झाल्या, यात निंगव्वा वण्णूरें गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माधव वण्णूरे आणि परसप्पा होळिकार कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता. वाद विकोपाला गेल्याने एका गटाने घराच्या छतावर जाऊन लोखंडी पत्रे आणि दगडफेक केली.

परसप्पा, भरामप्पा, अप्पण्णा होळिकार बंधूंच्या विरोधात हल्ल्याचा आरोप असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.