बेळगाव / प्रतिनिधी
प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चौघा मृतांच्या कुटुंबियांना प्रयागराज जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना ही माहिती दिली आहे.
२९ जानेवारी रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील वडगाव - आनंदनगर येथील रहिवासी ज्योती दीपक हत्तरवाट आणि त्यांची मुलगी कु. दिपा हत्तरवाट, बेळगाव शेट्टी गल्ली येथील रहिवासी अरुण कोपर्डे (वय ६१) आणि बेळगाव शिवाजीनगर येथील महादेवी हनुमंत बावनूर (वय ४८) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यू झालेला बेळगावतील या चौघांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३५ लाख रुपये दिले आहेत.
जिल्हाधिकारी रवी मंदार यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. प्रयागराज जिल्हा प्रशासनाने मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये थेट कुटुंबातील सदस्यांच्या किंवा वारसांच्या बँक खात्यात जमा केल्याचे जिल्हाधिकारी रवी मंदार यांनी सांगितले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही नावांमध्ये थोडी गफलत झाली असून ती चूक दुरुस्त करण्यासाठी काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
0 Comments