बेळगाव / प्रतिनिधी 

होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात दि. १४ आणि १५ मार्च असे दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहेत. बेळगाव शहर जिल्हा आणि तालुक्यांमध्ये शांतता राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

तत्पूर्वी शहर आणि तालुक्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये शांतता सभेचे आयोजन करून रंगपंचमीचा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. होळी आणि रंगपंचमी निमित्त बेळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत होळी साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी कडक पद्धतीने केली जाणार आहे.

बार, रेस्टोरंट आणि वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ ते १५ मार्च रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने रेस्टॉरंट, बार क्लब आणि हॉटेल मधून दारू विक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.