• येळ्ळूर येथील कुंडेकर कुटुंबियांचा आरोप
  • नाथ पै सर्कल खून - आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथील शहापूर नाथ पै सर्कल येथे काल रात्री एका तरुणाने प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केल्याप्रकरणी तरुणाच्या कुटुंबीयांनी आज बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागारासमोर निदर्शने केली. आमच्या तरुणाने आत्महत्या केली नाही. त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री शहापूर नाथ पै सर्कलमध्ये नवी गल्ली येथील ऐश्वर्या महेश लोहार (वय १८) हिची हत्या करून येळ्ळूर येथील प्रशांत यल्लाप्पा कुंडेकर (वय २९) याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, आज तरुणाच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागारासमोर ठिय्या आंदोलन केले.

आमच्या मुलाला त्यांनी फोन करून बोलावून घेतले आणि आमच्या घरातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री शहापूर पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. मृतदेह न दाखवता सोशल मीडियावर मुलाचे बदनाम केले आहे. आमच्या मुलाने तरुणीची हत्या केल्याचा आरोप खोटा असल्याचे तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितले.

याबाबत श्री रामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर म्हणाले, कोणीही मग तो तरुण असो वा तरुणी अशा कृत्यांमध्ये भाग घेऊ नये. एखादी अडचण आल्यावर ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी. रागाच्या भरात अशी कृत्ये करू नयेत. पोलीस विभाग आपले काम प्रामाणिकपणे करत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच सर्व काही उघड होईल असे त्यांनी सांगितले.

वर्षभरापूर्वी झालेल्या वडगाव मंगाईच्या जत्रेत दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही बाब दोघांच्या घरात माहीत आहे, तुला लग्न करायचे असेल तर तुझ्या वडिलांना घेऊन ये, असे तरुणीच्या आईने सांगितले, अशी उलटसुलट माहिती पुढे येत आहे. मात्र तपासानंतरच सत्य बाहेर येईल, असे पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी सांगितले.