बागलकोट : थकीत कर्जाचा शेवटचा हप्ता भरण्यास विलंब झाल्याने मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. बागलकोट जिल्ह्याच्या जमखंडी तालुक्यातील अद्दिहुडी गावात सावळगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. 

याबाबत प्राप्त माहिती अशी की, अद्दिहुडी गावातील हसीना जमखंडी या महिलेने मुधोळ येथील आय फायनान्समधून ८० हजारांचे कर्ज घेतले होते. यापैकी १५००/- रुपयांचा शेवटचा हप्ता भरायचा होता. यावेळी कर्ज वसुलीसाठी आलेल्या आय मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी कर्जाचा शेवटचा हप्ता भरण्याचा आज अंतिम दिवस असून थकीत हप्ता देण्याचा आग्रह केला. 

यावर हसीनाचे पती शरीफसाब यांनी कर्जाचा शेवटचा हप्ता आम्ही उद्या देऊ अशी विनंती  केली. मात्र  कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आम्ही उद्या वेळ देणार नाही, असे मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने शरीफसाब आणि मायक्रो फायनान्सचे कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर  मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी शरीफसाब यांच्यावर बांबूच्या काठीने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शरीफसाब यांना अधिक उपचारासाठी जमखंडी शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरीफसाब म्हणाले, शेवटचा हप्ता फक्त रु. १५००/- थकीत असल्याने मद्यधुंद अवस्थेत आलेल्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी माझ्यावर बांबूच्या काठीने हल्ला केला, मी थोडा वेळ द्या, अशी विनंती करूनही त्यांनी ऐकले नाही.  

दरम्यान या घटनेची नोंद सावळगी पोलीस स्थानकात करण्यात आली असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.