• तालुका म. ए. समितीच्या नियंत्रण कमिटी बैठकीत निर्णय
  • ५१ जणांची बांधकाम समिती स्थापन करणार  

बेळगाव / प्रतिनिधी  

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात हाती घेतलेल्या हुतात्मा स्मारक भवनचे ३० मार्च रोजी भूमिपूजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियंत्रण कमिटी बैठकीत घेण्यात आला.

रविवार दि. २ रोजी मराठा मंदिर येथे तालुका म. ए. समिती हुतात्मा स्मारक भवन कमिटीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार व तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. सीमालढ्यात हौतात्म पत्करलेल्या हुतात्म्यांची आठवण कायम राहावी, तसेच भावी पिढीत सीमाप्रश्नाची जागृती व्हावी या उद्देशाने म. ए. समितीच्यावतीने हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात भव्य भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सदर भवन उभारण्यासाठी दानशूर व्यक्तींनी देणग्या जाहीर केल्या आहेत. सुमारे १४ लाख रुपयांच्या देणग्या भवनासाठी जाहीर झाल्या असून काही रोख रक्कम जमा झाली आहे. नियोजित हुतात्मा स्मारक भावनात हुतात्म्यांचे फोटो, माहिती व  सीमाप्रश्नाबाबत  माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बहुमजली हुतात्मा स्मारक भवन उभारले जाणार असून त्यामध्ये कार्यालय आणि मीटिंग हॉल असणार आहे. ३० मार्चला भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून पाच लाख रुपयांची देणगी दिलेले म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्याहस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. भवनचे ट्रस्टी वगळता बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुका येथील ५१ जणांची बांधकाम कमिटी स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीला तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, सेक्रेटरी एडवोकेट एम. जी. पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, बी. एस. पाटील, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, बी. डी. मोहनगेकर,  बी. डी. पाटील यांच्यासह नियंत्रण कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • देणग्या जमा करण्याचे देणगीदारांना आवाहन  
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात भव्य हुतात्मा स्मारक भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अनेक दानशुरांनी यासाठी देणग्या जाहीर केल्या आहेत. देणग्या जाहीर केलेल्यांना भूमिपूजन या दिवशी देणग्या देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.