• म. ए. युवा समिती सीमाभागच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

कलबुर्गी येथील काही कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या बसवर लाल - पिवळा ध्वज लावून बसला काळे फासले तसेच चालक आणि वाहकाला लाल- पिवळा रंग फासून कर्नाटक - महाराष्ट्रातील भाषिक  वाद पुन्हा उकरून काढत शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अशा संघटनांवर कारवाई करून बेळगावसह कर्नाटक व महाराष्ट्राची शांतता भंग करू नये, अशा मागण्यांचे निवेदन म. ए. युवा समिती सीमाभागच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके म्हणाले, बेळगाव तालुक्याच्या बाळेकुंद्री गावात तिकीट देण्यावरून कंडक्टरला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला भाषिक वादाचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीसह मराठी भाषिक त्यात भरडले गेले होते. वादानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थगित झालेली कर्नाटक - महाराष्ट्र बससेवा शांततेत पुन्हा सुरू केली.

मात्र आता पुन्हा कलबुर्गी येथील कन्नड समर्थक संघटनांनी महाराष्ट्र बसला काळे फासून बेळगावसह कर्नाटक व महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे.  परिस्थिती पूर्ववत झाली असताना पुन्हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलबुर्गी येथील त्या कन्नड संघटनेवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कर्नाटक बंदच्या आवाहनाबाबत बोलताना ते म्हणाले की, कर्नाटक बंद  केला जात असून संपूर्ण राज्यातील जनतेला त्रास दिला जात आहे. मंत्र्यांना हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांतील शांतता राखावी लागेल. केंद्र सरकारने समन्वय समिती स्थापन करून दोन्ही राज्यांतील शांतता राखण्यासाठी पावले उचलावीत. केवळ चिथावणी देणाऱ्यांवरच नव्हे तर भडकावणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रविण रेडेकर, नारायण मुचंडीकर, राजू पाटील, जोतिबा यळ्ळूरकर, सुरज जाधव, आनंद तुप्पट, अभि कारेकर, मोतेश बार्देशकर आदी उपस्थित होते.