• बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील घटनेनंतर परिसरात एकच खळबळ

बेळगाव / प्रतिनिधी  

बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील एका घरात एका प्रेयसीची निर्घृण हत्या करून प्रियकराने स्वतः आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान या भीषण घटनेमुळे शहापूर हादरले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ऐश्वर्या लोहार (वय १८, रा. बॅ. नाथ पै चौक, शहापूर) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे तर प्रशांत कुंडेकर वय २९, रा. येळ्ळूर ता. बेळगाव) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, येळ्ळूर येथील प्रशांत कुंडेकर हा युवक नाथ पै चौक येथील ऐश्वर्या या युवतीवर प्रेम करत होता. गेल्या वर्षभरापासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र सदर युवतीने लग्नास नकार दिल्याच्या कारणाने युवकाने आधी युवतीवर चाकूने हल्ला करून तिला ठार केले. नंतर स्वतःवरही चाकूचे वार करून घेत जीवन संपविले. 

सायंकाळी घरी परतलेल्या कुटुंबीयांनी दार उघडून घरात प्रवेश करताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या व प्रशांत यांचे मृतदेह त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर कुटुंबीयांनी शहापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच ऐश्वर्या व प्रशांत यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले. 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त ईडा मार्टिन व उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे.