गोकाक / वार्ताहर  

प्रयागराजला जाणाऱ्या सहा प्रवाशांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व मृत बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूरमधील खिटौला पोलीस स्थानकांतर्गत  ही घटना घडली. KA 49 - M- 5054 क्रमांकाच्या तुफान वाहनात एकूण ८ जण प्रवास करत असताना पहाटे ५ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळल्याने वाहन पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात  भालचंद्र गौडा (वय ५०), सुनील शेडश्याळे (वय ४५). बसवराज कुर्ती (वय ६३), बसवराज दोडमल (वय ४९), एरन्ना शेबिनकट्टी (वय २७). विरुपाक्ष गुमठी (वय ६१) अशी मृतांची नावे आहेत. तर मुस्ताक शिंदीकुरबेट, सदाशिव उपदली या दोन्ही जखमींना जबलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्हा पोलिस जबलपूर जिल्हा पोलिसांच्या सतत संपर्कात असल्याचे समजते.