• विविध संघटित - असंघटित कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपात सहभागी

बेळगाव / प्रतिनिधी 

अंगणवाडीसह विविध संघटित आणि असंघटित कर्मचारी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ३ ते ७ मार्च दरम्यान बेंगळुरू चलो संपात सहभागी झाले आहेत.

सीटू राज्य समितीच्या आवाहनानुसार ३ ते ७ मार्च दरम्यान इंडिपेंडन्स पार्क, बेंगळुरू येथे हा संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे बेळगाव जिल्हा सरचिटणीस जी.एम.जिनेखान यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आपल्या विविध मागण्यांसाठी असंघटित कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी दि. ७, ८ आणि ९ मार्च रोजी संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एप्रिल २०२३ पासून ते अदा करायला हवे होते, मात्र ते अद्याप दिलेले नाही, त्यामुळे तेव्हापासून सेवानिवृत्त झालेल्या सर्वांना ग्रॅच्युईटी लवकरात लवकर देण्यात यावी. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार किमान २६,००० द्यावेत असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. अन्यथा राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे किमान १५ हजार वेतन मिळावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप करण्यात येईल, या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी एका अंगणवाडी सेविकेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, केंद्र सरकारने २०१८ पासून आमच्या वेतनात सुधारणा केली नाही, किमान वेतन दिले जावे, अंगणवाड्यांमध्ये एलकेजी - युकेजी सुरू करण्यात यावे, आमच्यावरील कामाचा ताण कमी करण्यात यावा, योग्य खाद्यपदार्थ व दर्जेदार मोबाईल देण्यात यावे, कर्मचाऱ्यांवरील अत्याचार थांबवावेत, इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही बेंगळुरूमध्ये संपात सहभागी होणार आहोत.

यावेळी सीटूचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.