सुळगे (ये.) : येथील नेताजी हायस्कुलच्या सभागृहात मराठी भाषा दिन (कुसुमाग्रज जन्मदिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या फोटोचे पूजन हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय माजी शिक्षक दिलीप दामले व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.पी.जी.पाटील सर यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीच्या "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" या गीताने झाली. यानंतर समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेची थोरवी स्पष्ट करून मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा  याचे विवेचन केले.

तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील सर यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा प्रबळ व्हायची असेल तर आपण आपल्या जीवनात वाचाल तर वाचाल हे तंत्र अवलंबून सर्व भाषांचा आदर करून त्या भाषा अवगत करा असा लाखमोलाचा सल्ला उपस्थित सर्वांना दिला.

मराठी भाषा दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष व नेताजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी साहित्याचा खरा सुवर्णकाळ हा भक्ती चळवळ मानला जातो. ज्यातून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यासारख्या संत कवींचा उदय झाला असे मत मांडले.

सदर कार्यक्रमाला नेताजी हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे.जे.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुजाता वंडेकर यांनी केले.