• पंढरपूर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम : भक्तांसह मान्यवरांची उपस्थिती  

पंढरपूर : येथे वैष्णव आश्रम भूमिपूजन प्रसंगी उपस्थित डी. जी. पाटील,
मारुती सांबरेकर, मोहन खांबले, अजित पाटील, रवींद्र गिंडे, 
संजय मजूकर, किरण गिंडे, बाळू केरवाडकर व इतर 

येळ्ळूर ता. १० : येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या भाविकासाठी पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वैष्णव आश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पंढरपूर येथे पार पडला. येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी.पाटील, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे आणि सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत तसेच हभप मारुती सांबरेकर महाराज, हभप मोहन खांबले महाराजांच्या सानिध्यात विधिवत पार पडला. येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडींच्या भाविकांना पंढरपूर मध्ये राहण्याची सोय व्हावी म्हणून पायी दिंडीच्या कमिटीने हा वैष्णव आश्रम बांधण्याचा संकल्प केला होता. 

या संकल्पची पूर्तता व्हावी म्हणून, येळ्ळूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य ह. भ. प. अजित पाटील यांनी स्वतःची पंढरपूर येथील एक गुंठा जागा दिंडीसाठी स्वखुशीने दिली आहे. या जागेत वैष्णव आश्रम बांधण्यासाठी येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने एक लाख रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी नेताजी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक व सल्लागारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दिंडी चालक ह. भ. प. मारुती सांबरेकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना  सांबरेकर महाराज म्हणाले, दान देतेवेळी चांगल्या व योग्य कामासाठी द्यावे या विचाराने नेताजी सोसायटीच्या संचालक मंडळाने योग्य निर्णय घेऊन पंढरपूर येथे वैष्णव आश्रम बांधण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर हभप अजित पाटील यांनी दिंडीच्या वारकऱ्यासाठी पंढरपूर येथे जागा दान देणे हे त्यांच्या आयुष्यात भाग्य होण्याचे संकेत आहेत. 

या आश्रमांच्या उभारणीसाठी भाविकांनी सढळहस्ते मदत करावी असे त्यांनी आवाहन केले. या वेळी रवींद्र गिंडे यांनी 11,111 रुपयांची देणगी दिली. त्याचप्रमाणे किरण गिंडे यांनी आश्रम बांधून झाल्यावर आश्रमातील लाईट फिटिंगचे काम करून देण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले, पायी दिंडीचे अध्यक्ष बाळू केरवाडकर यांनी आभार मानले. यावेळी पायी दिंडी कमिटीचे सर्व सदस्य, नेताजी सोसायटीचे सर्व  संचालक व सल्लागार,वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.