बेळगाव / प्रतिनिधी 

खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांचे पदचं रद्द करण्यात आले आहे. बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांनी कर्नाटक महानगरपालिका कायदा, १९७६ चे उल्लंघन केल्याचा उल्लेख करून सदर नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश जारी केला आहे.

नगरसेवक जयंत जाधव (प्रभाग क्रमांक २३) आणि मंगेश पवार (प्रभाग क्रमांक ४१) यांनी नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी लिलावात खाऊ कट्टा येथील गाळे घेतले होते. नियमानुसार,निवडून आल्यानंतर त्यांनी हे गाळे महानगरपालिकेला हस्तांतरित करणे आवश्यक होते. तथापि, त्यांचे पालन करण्याऐवजी, त्यांनी कुटुंबातील सदस्यांद्वारे ते स्वतःकडे कायम ठेवले, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचा त्यांना फायदा झाला.

याबाबत आलेल्या तक्रारी आणि प्रस्तावानंतर, प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टन्नावर यांनी कर्नाटक महानगरपालिका कायदा, १९७६ च्या कलम २६ (१) (के) चा वापर करून त्यांना अपात्र ठरवले. परिणामी, कायद्याच्या कलम २६(२) नुसार, प्रभाग क्रमांक २३ आणि प्रभाग क्रमांक ४१ मधील नगरसेवक म्हणून त्यांची पदे तात्काळ रिक्त घोषित करण्यात आली आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.