• पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील सांबरा गावात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआयच्या) एटीएममधून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे. चोरीची ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

रात्री उशिरा काही चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला, एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय करण्यासाठी काळ्या रंगाच्या स्प्रेचा वापर केला आणि नंतर गॅस कटरने एटीएमचे दरवाजे कापले. त्यानंतर एटीएममधून हजारोंची रक्कम लुटून पळ काढला. ही घटना मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.  या घटनेनंतर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी सांगितले की, बेळगाव तालुक्यातील सांबरा गावात बँक ऑफ इंडिया (एसबीआयच्या) एटीएममधून ७५ हजार ६०० रुपये काढण्यात आले. बुधवारी सांबरा गावात ज्या एटीएममध्ये चोरी झाली त्या भागाची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, चोरट्यांची चाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चेहऱ्यावर मास्क घातलेल्या तीन जणांनी केलेल्या चोरीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. असाच प्रकार अन्य काही ठिकाणी घडला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी कोण? आरोपी कोठून आले हे माहित नसून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही ते म्हणाले.