• दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी  

बेळगाव / प्रतिनिधी 

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव येथील श्री कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा साकारण्यात आली आहे. कपिलनाथांच्या दर्शनासाठी दक्षिण काशीत भक्तांची रीघ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिर ट्रस्टतर्फे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भोलेनाथ शंकराचे भक्त तासन्तास लांबच लांब रांगा लावून दर्शन घेत आहेत.

याबाबत मंदिराच्या पुजाऱ्याने प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना सांगितले की, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक, त्यानंतर रुद्राभिषेक, पालखी उत्सव, त्रिकाल पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

मंदिराचे विश्वस्त राकेश कलघटगी म्हणाले, महाशिवरात्री हा महादेवाच्या पूजेचा महत्त्वाचा दिवस आहे. शिव आणि शक्तीच्या संगमाचा दिवस महाशिवरात्री हा अविवाहित लोक आणि भाविकांसाठी शुभ दिवस आहे असे त्यांनी सांगितले.  

महाशिवरात्रीला नीळकंठाचे भक्त दिवसभर उपवास करतात, ओम नमः शिवाय चा जप करतात आणि दुसऱ्या दिवशी महादेवाला नैवेद्य दाखवतात आणि उपवासाची सांगता करतात, असे श्री कपिलेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी सांगितले.  

एकंदरीत महाशिवरात्रीच्या निमित्ताने दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिराचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला आहे. भक्तगण मोठ्या संख्येने शिवदर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवस्थान समितीच्या वतीने भक्तांसाठी रांग लावण्याकरिता योग्य सोय उपलब्ध करून दिली आहे. डॉ.एसपीएम रोडवरून सुरू होणारी रांग मंदिरापर्यंत अनेक टप्प्यातून पूर्ण होत आहे. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असून भाविक त्यात सहभागी होत आहेत. दक्षिण काशीतील कपिलेश्वर येथील भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून आज धार्मिक विधी तर  उद्या महाप्रसाद होणार आहे.