• बेळगाव ऑटो चालक - मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

टॅक्सी चालकाने केलेल्या मारहाणीनंतर गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू झाला. शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी खडेबाजार मधील शिवानंद लॉज जवळ ही घटना घडली होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी टॅक्सी चालक ऐवजी रिक्षाचालक असा उल्लेख केल्यामुळे जनतेमध्ये ऑटोचालकांबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. तेव्हा ऑटोचालकांना चुकीचे ठरवून ऑटोचालकांच्या व्यवसायावर होणारा परिणाम टाळावा, या मागणीसाठी बेळगाव ऑटो चालक व मालक संघटनेने  आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 

कार चालक व मालक संघटनेच्या सदस्याने मारहाण केल्यामुळे गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा मृत्यू झाला. मात्र, ऑटोचालक चुकीचा असल्याची भावना लोकांमध्ये दूर करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

यावेळी ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मन्सूर अब्दुल गफार होनगेकर म्हणाले, बेळगावमध्ये गोव्याच्या माजी आमदारावर झालेल्या प्राणघातक हल्ला आणि मृत्यूप्रकरणी ऑटोचालकांची नावे बदनाम केली जात आहेत. मात्र, गोव्याच्या माजी आमदाराला टॅक्सी चालकाने मारहाण केली. पण प्रसारमाध्यमांनी चुकीने ऑटोचालक उल्लेख केल्यामुळे, आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, तेव्हा आम्ही  कसे जगायचे, असा सवाल त्यांनी केला. गोव्याच्या माजी आमदारावर हल्ला झाला आणि लोक टॅक्सी चालकांना ऑटोचालक समजू लागले. यामुळे हा दुटप्पीपणा दुरुस्त करण्याची मागणी ऑटो चालक व मालकांनी केली.

या आंदोलनात शेकडो ऑटो चालक व मालक सहभागी झाले होते.