• एमएलआरसीच्या वॉर वॉन्डेड फाऊंडेशनतर्फे आयोजन

बेळगाव / प्रतिनिधी 

युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या अपंगत्वाचे शक्तीत रूपांतर करण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री सेंटरच्या वॉर वॉन्डेड फाऊंडेशनतर्फे उद्या मंगळवार दि. १८  फेब्रुवारी रोजी बेळगावात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वॉर वॉन्डेड फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल आसिफ मिस्ती यांनी दिली. 

आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी आपल्या सैनिकांनी दिलेले बलिदान अमूल्य आहे. युद्धात अनेक जवान शहीद तसेच जखमी झाले. योध्यांनी रणांगणातील लढाई जिंकली पण ती लढाई संपताच त्यांचा जीवनाशी संघर्ष सुरू झाला, आज त्यांच्यासोबत कुटुंबालाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. फाऊंडेशन युद्धात जखमी झालेल्या आणि आयुष्यभर दुःख सहन करणाऱ्या जवानांची काळजी घेते. ते म्हणाले की, फाऊंडेशन नौदलातील जखमी जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि सर्व विभागातील जवानांची काळजी घेत आहे आणि त्यांच्या अपंगत्वाचे शक्तीत रूपांतर करत आहे.

निवृत्त लेफ्टनंट विजय ओबेरॉय यांच्यासह इतरांनी २००२ मध्ये या फाऊंडेशनची स्थापना केली होती. हे फाउंडेशन सरकारी सेवांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील कार्य करते. याची माहिती देण्यासाठी उद्या जखमी सैनिकांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेला ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह इतर उपस्थित होते.