• कुटुंबीयांचा एकच आक्रोश 
  • साश्रू नयनांनी केले अंत्यसंस्कार 

बेळगाव / प्रतिनिधी 

महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून बेळगावला परतत असताना अपघाती  मृत्यू झालेल्या बेळगावातील चौघांचे मृतदेह आज बेळगावात पोहोचले. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मृतदेह बेळगावात दाखल झाले, त्यांच्याकडून बेळगावचे लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले. 

बेळगावातून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी गेले होते. दि. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कँटर, टेंपो ट्रॅव्हलर आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात झाला. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत बेळगाव बसवण गल्ली येथील रहिवासी  आणि  टेंपो ट्रॅव्हलरचा चालक  सागर शहापुरकर (वय ५५) नीता बडमंजी (वय ५०, रा. क्रांतीनगर गणेशपूर), छत्रपती शिवाजीनगर येथील संगिता मेत्री आणि वडगाव येथील ज्योती खांडेकर यांचा मृत्यू झाला. जखमी आणि मृतांचे शव आणण्यासाठी दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी इंदोरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. आमदार अभय पाटील, श्री रामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासह कुटुंबीयांनी बेळगावातील भूतरामनहट्टीजवळ मृतदेह स्वीकारले.

बसवण गल्ली, होसूर, बेळगाव येथे पोहोचल्यानंतर इंदोर, मध्य प्रदेशचे उपतहसीलदार आणि पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांच्या सह्या घेतल्या आणि  टेंपो ट्रॅव्हलर चालक सागर शहापूरकर (वय ५५) यांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यावेळी कुटुंबियांना दुःख अनावर झाले होते. 

तसेच वडगाव  येथील ज्योती खांडेकर, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्रांतीनगर (गणेशपूर)  येथील नीता बडमंजी (वय ५०) आणि छत्रपती शिवाजीनगर येथील संगिता मेत्री यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.