रायबाग / वार्ताहर 

चिंचली येथील श्री मायाक्का देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवी दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. यात्रेचा मुख्य दिवस उद्या रविवारी असून भाविकांचे संख्या आणखीन वाढणार आहे याची दक्षता घेत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

कृष्णा नदी काठ व दूध ओढा परिसरारात अंघोळीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिंचलीच्या चारीही बाजूने भाविकांचा ओघ सुरू आहे. यात्रेच्या परिसरात आत्तापासूनच वाहने,बैलगाड्यांसह भाविकांनी जागा करून तळ ठोकला आहे.चार किलोमीटर अंतरापर्यंत लोक जागा धरुन आहेत. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यासह इतर विक्रेत्यांना प्रशासनाने आवश्यक सूचना केलेल्या आहेत.

मंदिरात सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समितीने रांगेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. याशिवाय खाजगी स्वयंसेवक मंदिराचे सेवेकरी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.रविवारी यात्रा परिसरात वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. परिसरात चारही बाजूला पार्किंगची व्यवस्था केली आहे‌.चारही बाजूला तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा काळात मुख्य मार्गावर व मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी ही विशेष नियोजन करण्यात आले आहे. जनावरांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरला आहे. त्यामुळे तेथे पाण्याची व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.