चंदगड / लक्ष्मण यादव 

बेळगाव तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार होता. मात्र आमदार शिवाजीराव पाटील अचानक दिल्ली येथे असणाऱ्या एका महत्वाच्या बैठकीसाठी जाणार असल्याने हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. लोकसभेचे अध्यक्ष सन्मानीय ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  

मतदारसंघातील विकास कामांच्या व नवीन प्रकल्प, उद्योग आणण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नसल्याने आमदार शिवाजीराव पाटील यांनी बेळगाव म. ए. समितीचे नेते प्राध्यापक आनंद आपटेकर यांना सांगितले होते, त्यानुसार आपटेकर यांनीही हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. 

भविष्यात म. ए. समितीसाठी वेळ देऊन समितीच्या सर्व सदस्य, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी विनंती आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे.