• महापालिकेच्या नगररचना व विकास स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय


बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीतील स्मशानभूमींच्या व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून जनतेला चांगला लाभ मिळवून द्यावा, असा निर्णय बेळगाव महापालिकेच्या नगर रचना व विकास स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नगर रचना व विकास स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी सदर बैठक पार पडली. बैठकीमध्ये शहरातील स्मशानभूमींची देखभाल आणि व्यवस्थापन याबाबत सर्वांगाने चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे स्मशानभूमींमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असल्याबद्दल समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर सविस्तर चर्चेअंती बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींच्या व्यवस्थापनासाठी पालिका अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस समितीचे सदस्य नगरसेवक संतोष पेडणेकर, अभिजित जवळकर, शिवाजीराव मंडोळकर, पालिका अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर आदी उपस्थित होते.