• जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे मत
  • बेळगावात पोलिसांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ 

बेळगाव / प्रतिनिधी 

आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवरील सैनिक आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस खाते करते. धकाधकीच्या जीवनात काम करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात, असे मत बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी व्यक्त केले.

पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित दोन दिवसीय वार्षिक पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ चा आज बेळगावात शुभारंभ झाला. जिल्हा पोलीस परेड मैदानावर बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, डीसीपी रोहन जगदीश व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर विविध संघांनी शानदार संचलन केले.  

यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की, खेळामध्ये जय आणि पराजय हे सामान्य आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. पोलीस दबावाखाली काम करतात, वैयक्तिक आयुष्य आणि आरोग्य बाजूला ठेवून, सण-उत्सवाची पर्वा न ते कर्तव्य बाजवतात ही अभिमानाची बाब आहे. तेव्हा अशा क्रीडा स्पर्धा पोलिसांच्या वैयक्तिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत. ही एक क्रीडा स्पर्धा एक उदाहरण असून आपले पोलीस आयुक्त आणि उपायुक्त हे चांगले खेळाडू आहेत जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहेत, ते म्हणाले. 

यावेळी विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.