• चालत्या कारवर झाडल्या गोळ्या ; गणेशपूर येथील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी गणेशपूरच्या हद्दीत घडली.

बेळगावच्या शाहुनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक प्रफुल्ल पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बेळगुंदी गावातून कारमधून जात असताना गणेशपूर येथील हिंदुनगर रोडवर हल्लेखोरांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या गोळीबारात कारच्या काचा फुटल्या असून, जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांच्यासह अनेकांनी घटनास्थळाची तपासणी केली.

शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी चालत्या कारला अडवून गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला आहे. जखमी व्यावसायिकावर उपचार सुरू आहेत. गोळीबार झाल्याच्या ठिकाणाची तपासणी केली जात आहे. जखमीने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. या हल्ल्यातील जखमींचा रिअल इस्टेट चा व्यवसाय आहे. गेल्या वेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि हाडीपार देखील करण्यात आले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर तो परत आला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे ते म्हणाले.