• बेळगाव टपाल विभागातर्फे विशेष पोस्टल लिफाफा - पोस्टकार्ड्सचा शुभारंभ 

बेळगाव / प्रतिनिधी 

भारताचा इतिहास सांगण्याचे काम पोस्ट खात्याने केले आहे. इतिहास जाणणारेच इतिहास घडवू शकतात, असे मत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले.

टपाल तिकिटे आणि लिफाफ्यांच्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून बेळगावचा इतिहास आणि वारसा दाखविण्यासाठी बेळगावच्या टपाल विभागातर्फे विशेष पोस्टल लिफाफा आणि पोस्टकार्ड्सचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. नागनूरच्या रुद्राक्षी मठाचे श्री अल्लम प्रभू महास्वामीजी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, एमएलआयआरसीचे डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी टपाल तिकिटे आणि लिफाफ्यांच्या प्रदर्शन अभियानांतर्गत आज गोकाक फॉल्स, एस.जी. बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री यासह अनेक टपाल तिकीटे आणि लिफाफे आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. भूतकाळातील वैभव आणि इतिहास पोहोचवण्याचे काम टपाल खाते करत आहे. अनेक मान्यवर, ऐतिहासिक ठिकाणे, संगीत, साहित्य आणि इतर क्षेत्रातील कर्तृत्वाची नोंद करण्याचे महान कार्य पोस्ट विभाग करत आहे. इतिहास जाणून घेऊनच इतिहास घडवता येतो, असे ते म्हणाले.

कित्तूर चन्नम्माच्या १०० व्या विजयोत्सवासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने विशेष तिकीट जारी केले आहे, जे कौतुकास्पद आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या मेहनतीमुळे अवघ्या १८ दिवसांत तिकीट जाहीर झाले. तसेच, टपाल विभागाने महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त एक विशेष लिफाफा आणला आहे, जो २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. टपाल तिकिटे इतिहास सांगतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे संकलन  करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे ते म्हणाले. 

दरम्यान, पोस्ट बॉक्समधील व्यंगचित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला पोस्ट अधीक्षक विजय वडोनी, व्यंकटेश बदामी, रमेश कामटे,आप्पासाहेब दड्डीकर, जयशील नारायण शेट्टी आदी उपस्थित होते.