• पीडित महिलांचे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य शेतकरी युनियन महासंघाच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स आणि मध्यस्थांकडून छळ झालेल्या महिलांनी शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी  बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मायक्रो फायनान्स आणि मध्यस्थांकडून महिलांच्या होत असलेल्या फसवणुकीची चौकशी करण्याची मागणी केली. मायक्रो फायनान्सवर कारवाई न केल्यास सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना महासंघाच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या महिलांनी मध्यस्थ व मायक्रो फायनान्सर्सनी कर्ज देऊन फसवणूक केली, की  घरात भांडणे होतात. तसेच घरात घुसून मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार केली. तसेच त्रास देणाऱ्या फायनान्सर्सवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

वाल्मिकी मायक्रोफायनान्सने मध्यस्थांमार्फत महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले. मध्यस्थांकडून कर्जाचा मोठा वाटा घेऊन महिलांची फसवणूक झाली आहे. महिलांची कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. ते महिलांवर मानसिक अत्याचार करत आहेत आणि त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहेत. जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने संरक्षण द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी युनियन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष वीरप्पा देशनूर यांनी केली.

तर अन्य एका नेत्याने सांगितले, बेळगाव जिल्ह्यात मायक्रो फायनान्स आणि मध्यस्थ मिळून महिलांची फसवणूक करून पैसे लुटत आहेत. खानापूर तालुक्यात २ ते ३ कोटी रुपयांची फसवणुक झाली आहे. मायक्रो फायनान्सचे कर्मचारी घरी येऊन घरातील महिलांचा छळ करत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष न दिल्यास फसवणुक झालेल्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल असे ते म्हणाले.

यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी युनियन महासंघाचे पदाधिकारी व मायक्रो फायनान्सकडून छळ झालेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.