दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकेर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी मनू भाकरचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केले नव्हते, त्यामुळे वाद झाला होता. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत २ पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तर हरमनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ होती. तर डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या टी ६४ प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण ३२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १७ पॅरा ॲथलीट आहेत.