• रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांची पत्रकार परिषदेत माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १६ जानेवारी दरम्यान बेळगाव येथे १६ वी राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिला शरीरसौष्ठव स्पर्धा होणार असल्याची माहिती रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली. 

या संदर्भात बेळगाव येथे आज बुधवार दि. ८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, देशभरातून  ४०० हून अधिक पुरुष आणि ४० ते ५० महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध समित्या गठीत करून त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या स्पर्धेसाठी बेळगावातील अनेक मान्यवर सहकार्य करत आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रथम पारितोषिक रोख ३० लाखांचे प्रायोजकत्व दिले आहे. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज निर्णायक भूमिका बजावतील. लष्करासह विविध विभागातील २०० हून अधिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पदक विजेत्या स्पर्धकांची भरतीसाठी निवड केली जाईल. स्पर्धकांची नोंदणी १४ जानेवारीला होणार असून १५ जानेवारीला सकाळी ९ वाजल्यापासून स्पर्धा सुरू होतील. प्रवेश विनामूल्य आहे. त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

इव्हेंटचे ॲम्बेसेडर मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी बेळगावातील स्त्री-पुरुषांना शरीरसौष्ठव आणि शारीरिक आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना योग्य भोजन व इतर सुविधा पुरविल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आयोजक अजित सिद्दन्नावर यांनी बक्षिसांची माहिती दिली.

यावेळी सुनिल आपटेकर, सुहास चांडक, डॉ. मनिष हेरेकर, अविनाश पोतदार, एम. गंगाधर, हेमंत हावळ, अजित सिद्दन्नावर, अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.