- बेळगावात नागरिक हित रक्षणा समिती - इस्कॉनच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा
- धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास प्रभू स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली असून त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी आज बुधवार दि. ८ जानेवारी रोजी बेळगाव येथे नागरिक हित रक्षणा समिती आणि इस्कॉनच्या वतीने हिंदू जनक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बांगलादेशातील इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास प्रभू स्वामीजी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन करून उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.
इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तेथील मंदिरांचा विध्वंस, महिलांवरील अत्याचार, हिंदूंना अमानुष मारहाण सुरू आहे. हिंदूंच्या सतत होणाऱ्या हत्यांचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी इस्कॉनचे नागेंद्र स्वामीजी म्हणाले, बांगलादेशात हिंदू स्वामींवर अन्याय झाला आहे. जोपर्यंत श्री चिन्मयकृष्णदास प्रभू स्वामीजींची अटकेतून सुटका होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध सुरूच राहील, एकट्या हनुमानाला लंका जाळता आली, आता आम्ही हनुमानाच्या भूमीतील जनता स्वामीजींची सुटका होईपर्यंत एक होऊन लढा देऊ असे त्यांनी सांगितले.
तर जैन समाजाचे नेते राजेंद्र जैन म्हणाले, स्वामीजींना नजरकैदेतून सोडवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. स्वामीजींना सोडवण्यासाठी आलेल्या वकिलांवरही हल्ले करून त्यांची हत्या करण्यात आली. ऋषीमुनी अहिंसेचा मार्ग अवलंबतात. मात्र, धर्मावर संकट आल्यावर तलवार उपसायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य एका स्वामीजींनी सांगितले की, इस्कॉनच्या स्वामींची तात्काळ सुटका करावी. तसे न केल्यास बांगलादेशींना हिंदुस्थानची धार्मिक महाशक्ती दाखवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या जनआक्रोश मोर्चात विविध संस्थांचे स्वामीजी, हिंदुत्त्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments