• प्रशिक्षित हत्तींच्या साहाय्याने राबवली मोहीम  
  • शेतकऱ्यांना दिलासा

खानापूर / प्रतिनिधी  

खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या त्या रानटी टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले.

खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू होता. रानटी हत्तींनी पिकांचे नुकसान केल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. विशेषतः करंबळ गावात एका रानटी हत्तीचा उपद्रव वाढला होता, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्तीच्या धुमाकूळामुळे वनविभागाला तंत्रज्ञानाचा वापर करावा लागला.

यामध्ये शिमोगा येथील प्रशिक्षित हत्तींच्या पथकाने खानापुरात येऊन हत्तीला जेरबंद केले. खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय वनाधिकारी माधुरी दलवाई यांच्यासह वनविभागाचे अधिकारी या मोहिमेत सक्रिय होते. या यशस्वी कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून  वनविभागाच्या कार्यक्षमतेची दखल घेतली गेली आहे.

- व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇 -