• माजी महापौर मालोजीराव अष्टेकर 
  • बॅरिस्टर नाथ पै स्मृतिदिन 

बेळगाव / प्रतिनिधी 

भारताचे थोर सुपुत्र माजी खासदार बॅरिस्टरनाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील बॅरिस्टरनाथ पै चौकात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून नवीन फलकाचे अनावरण करण्यात आले.  या कार्यक्रमात श्री विनय याळगी व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते बॅरिस्टरनाथ पै यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी शहापूरचे माजी नगरसेवक श्री नेताजी जाधव तर वक्ते म्हणून माजी महापौर मालोजी अष्टेकर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, श्री. रमाकांत कोंडुसकर, श्री. अंकुश केसरकर,  श्री. शुभम शेळके हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. नेताजी जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. 

त्याचबरोबर बॅरिस्टरनाथ पै यांचा सीमाभागाचा संबंध कसा होता याचे विवेचन केले. यावेळी बोलताना श्री विनय याळगी यांनी बॅरिस्टर नाथ यांच्यासंबंधी बोलताना सांगितले की, नाथ पै हे याळगी घराचे एक सदस्यच होते. बेळगावत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या सीमाप्रश्नातील सहभागाची माहिती दिली. १७ जानेवारी १९७१ या दिवशी हुतात्मा दिनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. त्यासर्व प्रसंगाचे वर्णन त्यांनी कथन केले. याप्रसंगी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै आणि बेळगाव यांचा संबंध कसा होता याचे सविस्तर विवेचन करून बॅरिस्टर नाथ पै यांच्यावर इंदिरा गांधींनी महाजन अहवालावेळी सोपविलेली जबाबदारी आणि बॅरिस्टर नाथ पै यांचे लोकसभेतील कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली.  एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार खासदार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे भाषण सुरू झाले की लोकसभेत सर्व खासदार आणि मंत्री त्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमत असत असे ते म्हणाले, सीमाप्रश्नाविषयी त्यांची असलेली कळकळ शेवटच्या हुतात्मा दिनी दिसून आली असे ते म्हणाूले. श्री नाथ पै यांच्या स्मरणार्थ  बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाने सुरू केलेल्या व्याख्यानमालेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या व्याख्यान मालेला ५० वर्ष पूर्ण होतात. या व्याख्यानमालेचा सीमाभागातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आस्थेने उपस्थित होते. श्री.अमृत भागोजी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

यावेळी म. ए. समितीचे माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश अष्टेकर, श्रीकांत कदम, प्रदीप शटीतबाचे, शिवाजी हवळांनाचे, बापू जाधव, यशवंत देसाई, दशरथ शिंदे, रवी शिगेहळीकर, हिरालाल चव्हाण, सामजी, शाहू शिंदे, यल्लप्पा नागोजीचे, विजय जाधव, दिलीप दळवी, संजय बैलूरकर, विनायक कावळे, सूरज लाड, सूरज कडोलकर हे उपस्थित होते.