घटप्रभा / वार्ताहर 

हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक २०६७०) घटप्रभा येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. गुरुवार (दि. २) जानेवारी रोजी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी हिरवा झेंडा दाखवून थांब्याचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी मिरज ते बेळगावच्या दरम्यान असलेल्या घटप्रभा शहराचा झपाट्याने विकास होत असल्याचे अधोरेखित केले. वंदे भारत एक्स्प्रेसला हा थांबा जोडल्यानंतर हा प्रदेश आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. या मार्गावर आधीच मोठ्या संख्येने रेल्वे फेऱ्या सुरू आहेत. लोकांनी या सेवेचा सर्वोत्तम वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. 

घटप्रभा रेल्वे स्थानक अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत १८.१५ कोटी खर्चून विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या नेटवर्कद्वारे सार्वजनिक वाहतूक वाढविण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

घटप्रभा स्थानकावर वंदे भारत ट्रेनला थांबा देण्यात यावा ही लोकांची सुरुवातीपासूनची मागणी होती. आता ही मागणी पूर्ण झाल्यामुळे त्याचा आसपासच्या भागातील लोकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. विशेषत: पुणे आणि हुबळी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ते सोयीचे होईल आणि घटप्रभाच्या पर्यटन क्षमतांना चालना मिळेल.

हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २०६६९) घटप्रभा येथे सकाळी ७.२३ वा. पोहोचेल आणि सकाळी ७.२५ वा. पुढे मार्गस्थ होईल. तर पुणे ते हुबळी परतीच्या प्रवासात (ट्रेन क्रमांक २०६७०) घटप्रभा स्थानकावर सायंकाळी ७.३८ दाखल होईल तर ७.४० वा. हुबळीकडे प्रस्थान करेल.