• कोल्हापुरातील अजब घटना
  • कसबा बावड्यातील पांडुरंग तात्या परतले चक्क मृत्यूच्या दारातून घरी 
  • अंत्यविधीची तयारी केलेल्या नातेवाईक, ग्रामस्थांना दिला आश्चर्याचा धक्का 

कोल्हापूर / प्रतिनिधी 

हरीनामाचा जप करत असताना कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील वारकरी पांडुरंग तात्या यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता.  त्यामुळे उपचारासाठी  त्यांना तातडीने रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर तातडीने उपचार केले होते.  मात्र कोणताच प्रतिसाद न दिसल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. रुग्णवाहिकेतून त्यांना घरी आणत असताना रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली आणि पांडुरंग तात्या यांच्यात हालचाल दिसून आली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि चमत्कार घडला. उपचारानंतर पांडुरंग तात्या चक्क मृत्यूच्या दारातून परतल्याची प्रचिती आली. या घटनेची आज दिवसभर राज्यभरात चर्चा झाली.

पांडुरंग तात्यांचे वय ६५ वर्षे आहे. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी  हरीनामाचा जप करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी देखील होत्या. पांडुरंग तात्या घामाघुम अवस्थेत जमिनीवर कोसळल्याने त्यांना शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. शर्तीचे उपचार करून डॉक्टरांनी कोणतीच हालचाल न दिसल्याने पांडुरंग तात्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कसबा बावडा परिसरात ही बातमी समजताच त्यांच्या जवळचे पाहुणे, गावकरी त्यांच्या घरी गर्दी केली होती. अंत्यविधीची तयारी देखील करण्यात आली होती. रुग्णालयातून ॲम्बुलन्समधून पांडुरंग तात्यांना घरी आणण्यात येत होते. याच दरम्यान ॲम्बुलन्स खड्ड्यात आदळल्यानंतर धक्का बसला व पांडुरंग तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या शरीर उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पांडुरंग तात्या शुद्धीवर आले आणि चक्क ते स्वतःच्या पायावरच उभे राहत सर्वांना सुखद धक्का दिला.