- दिग्गज साहित्यिकांची मांदियाळी
- अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार
येळ्ळूर, ता. ३ : येळ्ळूर मध्ये दि. 5 जानेवारी रोजी, 20 वे येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वरनगर येळळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. तर दुसऱ्या सूत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे "आपली संस्कृती, आपला विकास " यावर आपले विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण. याचबरोबर "एक तास बसा... मनसोक्त हसा" हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. तर चौथ्या सत्रात सिने अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुलाखत होणार आहे. तर पाचव्या सत्रात 'जागर लोककलेचा ' हा जुगलबंदी भारुड, विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत. संमेलनाअध्यक्ष डॉ. शरद बाविस्कर हे धुळे जिल्ह्यातील रावेर येथील कोरडवाहू शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि संघर्षातून यश संपादन करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. दहावीत इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतरही सात भाषांवर प्रभुत्व मिळवून त्यांनी पाच मास्टर्स डिग्र्या प्राप्त केल्या आणि फ्रेंच तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली. सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली येथे फ्रेंच आणि फ्रँकोफोन स्टडीजचे प्राध्यापक आहेत.
त्यांचे आत्मकथन ‘भुरा’ मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत युरोपमधील तीन देशांत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या प्रवासाने शैक्षणिक यशासाठी प्रखर जिद्दीचे उदाहरण निर्माण केले आहे.
- परिचय : दत्ता देसाई
दत्तात्रय कृष्णाजी देसाई हे सामाजिक, शैक्षणिक, आणि जनविज्ञान चळवळीत कार्यरत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. १४ एप्रिल १९५६ रोजी बेळगाव येथे जन्मलेले देसाई यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यांनी १९८३ मध्ये राष्ट्रीयीकृत बँकेतून राजीनामा देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्य सुरू केले. ते समाज विज्ञान अकादमी, पुणे चे विश्वस्त असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण, शिबिरे, आणि समाजजागृती मोहिमा यांचे आयोजन करतात. विज्ञान आणि शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी जनविज्ञान चळवळ तसेच भारत ज्ञान विज्ञान समिती मधील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
ते अभ्यासक, लेखक, संपादक, आणि वक्ते असून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवरील अनेक पुस्तके, लेख, आणि ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. त्यांना विविध सामाजिक कार्यांसाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे
- लोकशाहीर प्रा. रणजित आशा अंबाजी कांबळे
- एम.एस.डब्लू. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी. aspirant
प्रा. रणजित कांबळे हे वक्ता, निवेदक, सुप्रसिद्ध व्याख्याते, गायक व शाहीर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक या पदावर रायगड, पालघर आणि नंदुरबार येथे ४ वर्षे ग्रामविकासाची सेवा केली. वयाच्या सातव्या वर्षी कलाक्षेत्रात प्रवेश करून, त्यांनी गीत राधाई आणि गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०० हून अधिक कार्यक्रमांचे यशस्वी संचालन केले आहे.
२०१३ मध्ये भीमनाद विद्रोही शाहीरी जलसा व २०२० मध्ये नव महाराष्ट्र लोकशाहीरी जलसा स्थापन करून ३०० हून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या "एक तास बसा मनसोक्त हसा" या एकपात्री विनोदी कार्यक्रमाचे ४०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, ते महाराष्ट्रभर प्रेरणादायी व्याख्यानांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कलेच्या प्रवासाला महाराष्ट्रातील रसिकजनांचे मोठे पाठबळ लाभले
- वंदना गुप्ते – एक प्रख्यात मराठी अभिनेत्री
वंदना गुप्ते या मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा आणि श्री अमर वर्मा यांच्या त्या कन्या आहेत. भारती आचरेकर आणि राणी वर्मा या त्यांच्या बहिणी आहेत.
- व्यावसायिक जीवन :
- नाट्य क्षेत्र :
वंदना गुप्ते यांनी वाडा चिरेबंदी, चारचौघी, सुंदर मी होणार, आणि हरवलेल्या पत्त्यांचा बंगला यांसारख्या अजरामर नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
- चित्रपट :
आंधळी कोशिंबीर, टाईम प्लीज, पछाडलेला, आणि लपंडाव यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
- दूरचित्रवाणी मालिका:
ह्या गोजिरवाण्या घरात, सुखाच्या सरींनी हे मन बावरे (मराठी), आणि सजन रे झूठ मत बोलो, करीना करीना (हिंदी) या मालिका गाजल्या आहेत.
- पुरस्कार आणि सन्मान :
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार.
- झी नाट्य गौरव २०२३ पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार.
- ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात गोगटे फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार.
- वैयक्तिक जीवन :
वंदना गुप्ते या आज वयाच्या ७२ व्या वर्षीही सक्रिय आहेत आणि हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकात काम करत आहेत. त्यांचे योगदान मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य मानले जाते.
- जुगलबंदी भारुडातून समाजप्रबोधन :
- सादरकर्ते: संदीप मोहिते (सांगोला) विरुद्ध आबा चव्हाण (जत)
संदीप मोहिते आणि अण्णा चव्हाण यांच्या जुगलबंदीतील भारुड कार्यक्रम समाजप्रबोधनासाठी प्रसिद्ध आहे. व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्री भ्रूणहत्या, आणि मानवता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रबोधन करत, त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. हा लोकप्रिय कार्यक्रम समाजासाठी संदेश देणारा आणि प्रेरणादायी ठरतो.
- आर. एम. चौगुले - उद्घाटक
बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावातील आर. एम. चौगुले हे यशस्वी अभियंता, उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांनी आर. एम. चौगुले असोसिएट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि नंतर वननेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीची स्थापना करून शेकडो लोकांना रोजगार दिला. त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगमधील डिप्लोमा व 2017 मध्ये बुंदेलखंड विद्यापीठातून बी.टेक पदवी प्राप्त केली.
जोतिर्लिंग मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन आणि मार्कंडेय संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात योगदान दिले आहे. तसेच कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठान अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम व शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे नेतृत्व सिमाभागासाठी प्रेरणादायक ठरले आहे.
- स्वागताध्यक्ष - दुधाप्पा बागेवाडी
संमेलनाचे स्वागताध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी हे येळळूरचे सुपुत्र असून एक प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्टॅक्टर आहेत. येळळूर गावच्या प्रत्येक सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. येळळूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी समर्थपणे पार पडली होती. येळळूर विभाग म. ए. समितीचे ते कार्याध्यक्ष आहेत. सीमा चळवळीमध्ये ते कायम अग्रेसर असतात. येळळूर गावच्या प्रत्येक धार्मिक कार्यात ते कायम सहभागी होत असतात. गावातील अनेक संघ संस्थाना ते नेहमीच मदतीचा हात पुढे करीत असतात.
0 Comments