बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये १९२४ साली महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेले काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या रामतीर्थनगर येथील स्मारकाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते पार पडला.
बेळगाव येथे १९२४ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रामतीर्थनगर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. गंगाधर देशपांडे स्मारक इमारतीने सुमारे १५ एकर क्षेत्र व्यापले आहे. सुमारे १.५८ कोटी खर्चून येथे गंगाधर देशपांडे यांचा पुतळा, स्मारकाची इमारत, फोटो गॅलरी, बंदिस्त कंपाऊंड, तारांचे कुंपण, पेव्हर आणि उद्यान साकारण्यात आले आहे.
याप्रसंगी त्यांच्या समवेत मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश दर्शनपूर, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.
0 Comments