• निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला दुपारी एकच्या सुमारास मुखाग्नी दिला गेला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि.२६ डिसेंबर) वृद्धापकाळानेवयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री ९.४१ वा.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काल दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. यावेळीही अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून दिल्लीतील निगम बोध घाटाकडे त्यांचे पार्थिव रवाना झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली.

  • सर्वांना अश्रू अनावर :

डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचेही पालन करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवण्यात आला होता. त्यासोबतच अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले.