• मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताने गाजवला

ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेला  बॉक्सिंग डे कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंंतिम फेरीच्या दृष्टीने  दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना सुरुवातील ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला होता. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने अडचणीतून हा सामना बाहेर काढला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले.  दोघांनी सर्वात आधीच टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट टाळले. त्यानंतर एक एक धाव घेत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९ विकेट्स गमावून ९ धावा ३५८ केल्या केल्या आहेत.  नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५ , तर मोहम्मद सिराज नाबाद २ धावांवर खेळत आहे. खराब प्रकाशमानामुळे पंचांना सामना लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

  • नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी

ऋषभ पंत २८ धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजा १७ धावा करून बाद झाला, तेव्हा भारताला फॉलोऑनचा धोका होता. भारताने २२१ धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निसटल्यासारखे वाटले, पण नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मानली नाही. या दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नितीश आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. सुंदरने १६२ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. तर नितीशने जबरदस्त शतक झळकावले. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत १० चौकार आणि १ षटकार आला. रेड्डीने १७१  चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. 

दुसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने केवळ १६४ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. इथून भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठू शकणार नाही असे वाटत होते. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने १९१ धावांच्या स्कोअरवर सहावी तर २२१ रन्सच्या स्कोअरवर सातवी विकेट गमावली. यानंतर जवळपास सर्वच आशा मावळल्या. येथून नितीश रेड्डी आणि सुंदर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आठवी विकेट पडेपर्यंत संघाला ३४८ धावांपर्यंत नेले. तिसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.