- पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज
- वीसहून अधिक जण जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
लिंगायत पंचमसाली समाजाला २अ आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
बेळगावात मंगळवारी पंचमसाली समाजाला २अ आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाच्यावतीने कोंडुसकोप येथून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनासाठी आलेल्या काही पंचमसाली नेत्यांना सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी रोखले. तसेच श्री बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांना अटक केली.
यामुळे संतप्त आंदोलकांनी पोलिसांसह काही वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी झालेल्या दगडफेक आणि लाठीमारात वीसहून अधिक जण जखमी झाले.
यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडून संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. परिणामी बेळगाव - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनानंतर सुवर्ण विधानसौधसमोर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या बसवनगौडा पाटील - यत्नाळ, इराण्णा कडाडी, अरविंद बेल्लद यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0 Comments