- विम्याच्या रक्कमेसाठी भावानेच केला भावाचा खून
बेळगाव / प्रतिनिधी
विम्याच्या रक्कमेच्या हव्यासापोटी एका भावाने आपल्या भावाचा निर्घृण खून केला. बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यातील कल्लोळी गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या खुनातील मुख्य आरोपी बसवराज तळवार याच्यासह बापू शेख, ईरप्पा हडगिनाळ, सचिन कंठेन्नवर अशा एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, आरोपी बसवराज तळवार यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नावावर ५० लाख रुपयांचा विमा केला होता. आपला भावाचे निधन झाले तर त्या विम्याची रक्कम स्वतःला मिळेल, या हव्यासापोटी त्याने आपल्या भावाला फसवून त्याला विषारी पदार्थ देत अज्ञात ठिकाणी नेऊन बापू शेख, ईरप्पा हडगिनाळ, सचिन कंठेन्नवर या आपल्या साथीदारांसोबत भावाचा लोखंडी रॉडने मारून खून केला.
या घटनेनंतर, चारही आरोपी कल्लोळी गावातून फरार झाले होते. परंतु घटप्रभा पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास घेत सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना धक्का बसला असून पोलिसांनी खुनाचे कारण आणि आरोपींचे कृत्य याबाबत सखोल तपास सुरू ठेवला आहे.
0 Comments