बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी बोरगाव, रामदुर्ग तालुक्यातील कामणकोप्प,धारवाड,तसेच बेळगाव शहरातील सह्याद्रीनगर येथे लोकायुक्तांनी धाडी घेतल्या आहेत. आज सकाळी सुरू झालेल्या या कारवाईत पुढील चौकशी तपासणी सुरू आहे.
या धाडसत्रा दरम्यान निपाणी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचे लेखापाल विठ्ठल धवळेश्वर यांचे घर आणि कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटे छापा टाकला. यापूर्वी विठ्ठल धवलेश्वर यांना चिक्कोडीहून बागलकोटला १.१० कोटी रुपयांची अवैध वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या निपाणी शहरातील भाडोत्री घरातही भरपूर रोख रक्कम सापडली आहे. धवलेश्वर यांच्यावर अवैध जमविल्याचा संपत्तीचाही आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
तर धारवाड येथील कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा भजंत्री यांच्या शहरातील गांधीनगर येथील निवासस्थानावर आज पहाटे लोकायुक्त डीवायएसपी व्यंकनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.
बेकायदेशीर संपत्तीच्या आरोपावरून लोकायुक्त पोलिसांनी धारवाडमधील गांधीनगर येथील गोविंदप्पा यांचे घर, तेजस्वीनगर येथील त्यांच्या जावयाचे घर, सौंदत्ती तालुक्यातील हुली, उगारगोळ फार्म हाऊस, नरगुंद येथील त्यांच्या भावाचे घर आणि लकमनहळ्ळी येथील केआयएडीबी कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकले आहेत. लोकायुक्त पोलिसांनी गोविंदप्पा यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानासमोरील गाड्यांचीही झडती घेतली. तसेच त्यांच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासली जात असून, गोविंदप्पा यांच्याशी संबंधित एकूण सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकून तपासणी केली. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे लोकाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments