बेळगाव / प्रतिनिधी 

शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव शहरातील पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध पोलिस स्थानकांच्या हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणातील ऐवज मूळ मालकांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया पार पडली.

जिल्हा पोलीस क्रीडांगणावर झालेल्या प्रॉपर्टी परेडमध्ये चोरीला गेलेला ऐवज संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला. विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणातील तब्बल १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने यासह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ताबा मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आला. 

गेल्या काही दिवसात शहर तसेच उपनगरांमध्ये याचप्रमाणे तालुक्यातही चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तक्रारींच्या आधारे तपास सुरु करून काही चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल आज मूळ मालकांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडली.