- फरार आरोपींचा शोध सुरू ; जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी यापूर्वीच तिघांना अटक करण्यात आली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सोमवारी नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत अल्ताफ मकानदार (वय ३५) या तरुणाच्या हत्येबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, मृत अल्ताफ मकानदार याच्या वडिलांनी उस्मान आणि मुक्तूम यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. उस्मानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हलशीनजीक एका छोट्या खड्ड्यातून वाळू उत्खनन करत असताना दुचाकी घेऊन आलेल्या कोणीतरी वरून गोळी झाडली असावी असा अंदाज आहे.
या प्रकरणी दोघांची चौकशी करण्यात आली आहे. तपासावेळी एका पोत्यात मांस आढळून आले. तसेच, तेथे कोणीही वाळू उत्खनन करताना आढळून आले नाही. तर ताब्यात घेतलेल्या दोघांना वन्यजीव कायद्यानंतर्गत अटक करण्यात आले आहे. मुक्तूमची सखोल चौकशी केली असता, या प्रकरणाशी संबंधित मलिक आणि अरबाज कित्तूर या दोघांची नावे उघड झाली आहेत. दरम्यान मलिक आणि अरबाज कित्तूर हे दोघेही फरार असून अटक करून चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
0 Comments