बेळगाव / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पाहणीपत्रात वक्फ मालमत्ता म्हणून नोंद झाली आहे. यासंदर्भात सरकारने शेतकऱ्यांना पाठवलेली नोटीस जरी मागे घेतली असली तरी सरकारने शेतकऱ्यांना ती नोंद हटवून कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी मागणी करीत, मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत बेळगावात भाजपकडून भव्य मोर्चा काढून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
आज वक्फ बोर्ड, मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच काँग्रेस सरकारविरोधात बेळगाव भाजपकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चन्नम्मा सर्कलमध्ये काही काळ धरणे आंदोलन करून, घोषणाबाजी करीत काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी भाजप नेत्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर केले.
यावेळी बोलताना माजी आ. संजय पाटील, माजी मंत्री मुरुगेश निराणी, भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी वक्फ बोर्ड रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस सरकार, मंत्री जमीर अहमद यांच्यावर सडकून टीका केली.
या आंदोलनात माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, सोनाली सरनोबत, सचिन कड्डी, सोनाली सरनोबत, मुरुगेंद्र पाटील यांच्यासह बेळगाव भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
0 Comments