- टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड
- दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल - विराट कोहलीची शतके
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ४८७ धावा करत डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ५३४ धावांचे आव्हान दिले आहे.
भारताने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताचा डाव १५० धावांवरच आटोपला. त्यामुळे टीम इंडिया संकटात होती. पण कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त १०४ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला ४६ धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह दुसऱ्या डावात सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी २०१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. यशस्वी जयस्वालने २९७ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. तर केएल राहुलने १७६ चेंडूंचा सामना करत ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली.विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नववे शतक ठोकले आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील त्याचे हे सातवे शतक आहे. यासह टीम इंडियाने ४८७ धावांवर मजल मारली. विराटचे शतक आणि टीम इंडियाच्या ५३३ धावा झाल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने डाव घोषित केला.
दरम्यान, विजयासाठी ५३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने मॅकस्वीने रूपाने पहिला धक्का दिला. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला पायचीत करत तंबूत धाडले. त्यामुळे अधिक पडझड टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सला नाईट वॉचमन पाठविण्यात आले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांत तीन विकेट्स गमावल्या आहेत.
आता ५३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवणारं का? याची सर्वांना उत्सुकता आहे. उलट टीम इंडियाने हा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या मार्गातील अडथळा काहीसा दूर होईल, तर ऑस्ट्रेलियाची वाट मात्र अवघड होत जाईल. इतकेच नव्हे तर टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल.
0 Comments