बेळगाव / प्रतिनिधी
बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील सतसंस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी या महोत्सवाची यशस्वी सांगता झाली. क्रीडा महोत्सवात तीन दिवस विद्यार्थी आणि एक दिवस पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शाळेचे अध्यक्ष सिद्धारूढ संगोळी, मुख्याध्यापक ईरगौडा परसगौडा पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील फिटनेस क्लबचे अध्यक्ष श्रीधर बालट्टके व शाळेचे मेंटर डी.विजयकुमार यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थांच्या क्रीडास्पर्धांमध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, कबड्डी, खो-खो अशा विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या. प्रत्येक गटासाठी वेगवेगळ्या वयोगटानुसार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि आपले कौशल्य दाखवले.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी पालकांसाठी थ्रो बॉल रेस, कब्बडी अशा विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी मोठ्या आनंदाने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पालकांसाठीही हा दिवस विशेष ठरला, कारण यावेळी त्यांनी स्वतःमध्ये लपलेल्या खेळाडूला ओळखले आणि आनंद अनुभवला.
या चार दिवसात खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, एकजूट आणि नेतृत्वगुणांचा विकास झाला. पालकांच्या सहभागामुळे क्रीडा महोत्सव अधिक खास बनला. शेवटच्या दिवशी विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आणि सर्व सहभागींचे कौतुक करण्यात आले.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. एकंदरीत हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
0 Comments