बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील १३ वर्षांच्या शौर्य वाघाचा आज मृत्यू झाला. शौर्य मायकोप्लाझ्मा, सायटॉक्सझोनोसिस आणि बेबेसिओसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचावर प्राणिसंग्रहालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार निष्फळ ठरल्याने रविवारी सकाळी ९.४० वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. 

शवविच्छेदन तपासणीनंतर केंद्र सरकारच्या नियमानुसार शौर्य यांच्यावर प्राणिसंग्रहालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालक मारिया क्रिस्तू राजा, सहायक वनसंरक्षक नागराज बलेहोसूर, विभागीय वनअधिकारी पवन कुरणिंग प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर डॉ.नागेश हुईलगोळ, पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर डॉ. प्रशांत कांबळे व प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

२०२१ मध्ये शौर्यला बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयातून बेळगावच्या मिनी प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून हा वाघ पर्यटकांचे आकर्षण ठरला होता. 

“गेल्या वर्षी देखील शौर्याला अशाच आरोग्याच्या समस्येने ग्रासले होते. मात्र उपचार केल्यावर तो बरा झाला. पण, आता समस्या पुन्हा त्रास सुरू झाल्याने प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी २१ दिवस सतत उपचार करूनही तो वाचू शकला नसल्याची माहिती विभागीय वनअधिकारी पवन कुरणिंग यांनी दिली.