• पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथील एसडीए कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी खडेबाजार पोलिस स्थानकात तिघाजणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिक गडद होत असताना, पोलिसांनी तपासासाठी उच्च अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. याबाबत पोलिस आयुक्त ईडा मार्टिन  यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

बेळगावमधील तहसिलदार कार्यालयात झालेल्या एसडीए कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर एफआयआर नोंदवले असून, तपासाची सूत्रे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. पोलिस आयुक्त ईडा मार्टिन  यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. तपास सुरू असून काही लोकांची चौकशी सुरु आहे. तहसिलदार, एसी ऑफिसकडून माहिती मिळवली आहे. रुद्रेश यडवन्नवरने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सॲप मेसेज पाठवले होते. यामध्ये मंत्र्यांच्या स्वीय सचिवांचे नाव समोर आले आहे. याबाबत तपासणी सुरू आहे. रुद्रेशचा मोबाईल त्याच्या कुटुंबियांकडे आहे, तो मोबाईल एफएसएल कडे पाठवून मोबाईलमधून माहिती मिळविण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले असून बँक स्टेटमेंट आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. रुद्रेशच्या फोन कॉल्स ची तपासणी करण्यात येत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा केला जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. तपासाच्या प्रारंभिक टप्प्यात पोलिसांनी रुद्रेशच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून मेसेजचे स्क्रीनशॉट घेतले आहेत, जे तपासाच्या पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.