• रुद्रेशच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी  

बेळगाव / प्रतिनिधी 

सरकारी कर्मचारी रुद्रेशची आत्महत्या निंदनीय आहे, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून हेब्बाळकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा निकटवर्ती सोमू याच्यावर आरोप करण्यात आला आहे. सरकारने लक्ष्मी हेब्बाळकर यांची संपत्ती लवकरात लवकर काढून घ्यावी. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि सीबीआयने सखोल तपास करून मृत रुद्रेशला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. एसडीएचे कर्मचारी रुद्रेश येरागण्णाचा तपास दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न झाला आहे. रुद्रेशचे कुटुंबिय मंत्री हेब्बाळकर यांच्यावर टीका करत आहेत , तरी त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा. आत्महत्येला तीन दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसून त्यांना तात्काळ अटक करून सत्य काय आहे ते कळावे, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद बेल्लद म्हणाले , कर्मचारी रुद्रेश यारागण्णा यांच्या आत्महत्येमागे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निकटवर्तीयाचे  नाव समोर आले आहे. तेव्हा मंत्री लक्ष्मी  हेब्बाळकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.रुद्रेश यारागण्णा यांच्या आत्महत्येचा तपास दुसरीकडे वळवल्याचा संशय आहे. याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.

तर माजी आमदार संजय पाटील म्हणाले, रुद्रेशच्या आत्महत्येला तीन दिवस झाले आहेत. रुद्रेश हा लिंगायत समाजाचा होता. पंचमसाली समाजाच्या संघर्षात तो आघाडीवर होता. मग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर दोन्ही दिवशी गप्प का बसल्या, असा सवाल त्यांनी  केला. रुद्रेशने आत्महत्या करून दोन दिवस झाल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुद्रेशला न्याय मिळावा, असे निवेदन दिले आहे. हा मोठा विनोद असल्याचे त्यांनी सांगितले. रुद्रेशचा मोबाईल गायब आहे. मंत्री हेब्बाळकर यांना सत्तेची लालसा नव्हती तर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याऐवजी त्या दोन दिवस गप्प का राहिल्या? रुद्रेशच्या आत्महत्येला सरकारच्या बाजूने न्याय मिळण्याची आशा नाही, असे ते म्हणाले.

जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी म्हणाले, रुद्रण्णा यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन त्यांच्या कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकून आत्महत्या केली. आतापर्यंत आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहरी विभागाच्या अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, रुद्रण्णा चंद्रगी, डॉ. सोनाली सरनोबत, सविता गुड्डाकायू, जेडीएस नेते मारुती अष्टगी, शंकर मोदलगी, वकील विनोद पाटील आदी उपस्थित होते.