- पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी धुव्वा
पर्थ : टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी २९५ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ५८.४ षटकांमध्ये २३८ धावांवर गुंडाळला. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओप्टस स्टेडियममध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरला. टीम इंडियाने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत १ -० ने आघाडी घेतली.
रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत कॅप्टन जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. पहिला डाव १५० धावांवर आटोपला. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली. कांगारुंना पहिल्या डावात १०४ धावांवर गुंडाळले. जसप्रीत बुमराह याने ५ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने 3 तर मोहम्मद सिराज याने २ विकेट्स मिळवल्या.
त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुनरागमन केले. टॉप ४ मधील देवदत्त पडीक्कल याचा अपवाद वगळता इतर ३ फलंदाजांनी धमाका केला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी केली. केएल राहुलने ७७ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल २५ धावा करुन माघारी परतला. यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक १६१ धावा केल्या.
ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर २९ धावांवर बाद झाला. तर विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी अखेरीस फटकेबाजी केली. विराट कोहली याने चौकारासह शतक ठोकले. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे ३० वे शतक ठरले. विराटच्या या शतकासह कॅप्टन बुमराहने १३४.३ षटकांमध्ये ६ बाद ४८७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. यावेळी टीम इंडियाकडे ४६ धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचे तगडे आव्हान मिळाले.
- ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव :
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. नॅथन मॅकस्वीनी शून्यावर आऊट झाला.कॅप्टन पॅट कमिन्स २ आणि मार्नस लबुशेन ३ धावांवर बाद झाले. मार्नस आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १२ धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.
उस्मान ख्वाजा ४ आणि स्टीव्हन स्मिथ १७ धावांवर बाद झाले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडला फार वेळ तग धरता आला नाही. हेडने ऑस्ट्रेलियासाठी १०१ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. मिशेल मार्श याने ४७ आणि मिचेल स्टार्कने १२ धावा केल्या. नॅथन लायन आला तसाच शून्यावर परतला. हर्षित राणा याने अॅलेक्स कॅरीचा २६ धावांवर त्रिफळा उडवला. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला आणि भारताने २९५ धावांनी सामना जिंकला.
टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी ३ -३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना बाद केले. तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी १ - १ विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
0 Comments