• अत्यंत खराब रस्त्यावरील खड्डे बुजविणे - डांबरीकरण कामाला प्रारंभ 

सुळगा (हिं.) : केंबाळी नाल्यापासून बेळगाव - बाची 
मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाला
सुरुवात करण्यात आली आहे 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव - वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते बाची या पट्ट्यातील झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत या भागातील अनेक संघटनांनी आवाज उठवला होता. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने सुळगा (हिं.) येथून (केंबाळी नाला) पासून रस्त्याच्या डांबरीकरणाला बुधवार दि.२७ नोव्हेंबर पासून सुरुवात केली आहे.

केंबाळी नाला, सुळगा ते बाची या जवळपास दहा किलोमीटर अंतराच्या पट्ट्यातील रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या खड्ड्यांतून खडी, बोर्डर टाकून बुजवण्यात आले होते. सदर खडी पुन्हा रस्त्यावरती विखुरलेली होती. रात्र बुधवारी दुपारपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिथे रस्ता अत्यंत खराब आहे अशा खराब रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि त्याच्यावर डांबरीकरण करणे याला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र रस्त्याची रुंदी अथवा पक्का रस्ता कधी होणार हे अद्यापही प्रवासी आणि नागरिकांना समजत नसल्याने याचा गुंता कधी सुटणार? याबाबत अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात या भागातील नागरिक असल्याचे चित्र आहे.

  • रुंदीकरण - दुपदरीकरण आवश्यक :
या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा पाहता या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घेऊन रस्त्याची रुंदी वाढविणे, दुपदरीकरण करणे हे अतिशय गरजेचे आहे. मार्च, एप्रिल, मे या महिन्याच्या अगोदर सदर रस्ता पूर्ण झाला खरंच नागरिकांना येत्या पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे जाईल.अन्यथा येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ या प्रवासी वर्गावर पुढेही येतच राहणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामाची तातडीने पूर्तता करावी अशी जोरदार मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.

  • रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षतोडीचे काम संथगतीने :
या भागातील रस्त्याच्या दुतर्फ असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्याला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे काम चालू होऊन आज पंधरा-वीस दिवस होत आले. हे काम संत गतीने चालू असल्याने रस्ता काम येत्या पावसाळ्याच्या अगोदर तरी पूर्ण होईल का? अशी शंका प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे.