• वाढत्या गुन्हेगारीने बेळगावकर हैराण  

बेळगाव / प्रतिनिधी 

महांतेशनगर येथे एका युवकावर गोळीबार झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा केएमएफ डेअरीजवळ ही घटना घडली असून दोन गोळ्या लागल्याने युवक जखमी झाला आहे. जीपमधून मित्राच्या घरी जेवणाला गेले असता ही घटना घडली आहे.

प्रणित कुमार (वय ३१ रा. टिळकवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री ९.३० ते १० या वेळेत ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. जखमी प्रणित कुमारला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ला भेट देऊन पोलीस आयुक्तांनी जखमी युवकाकडून घटनेसंबंधी माहिती घेतली. गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार प्रणित कुमार आपल्या मित्राच्या घरी जेवणाला गेला होता याच ठिकाणी त्याच्या मैत्रिणीलाही बोलावून घेण्यात आले होते. थोड्यावेळेत मैत्रिणीशी संबंधित तिघेजण तिथे आले. त्यांनी गोळीबार केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

आपल्यावर गोळ्या कोणी झाडल्या? त्यांची नावे आपल्याला माहिती आहेत मात्र आपण ती सांगणार नाही असे जखमी युवकाने सांगितले. त्याने आपल्या सोबत दोन पुंगळ्याही आणल्या होत्या.